वसंत पुरुषोत्तम काळे
वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ व. पु. काळे (मार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१) हे मराठी लेखक, कथाकथनकार होते.
स्रोतांतून
संपादन- ’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं. सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.
- आपत्ती पण अशी यावी, की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.
- 'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’
तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!’
'का?’
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’ - बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पण दुसरया बाबतीत निर्माण होणारी भिंतं
त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरूषांचं निम्म आधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं. आणि बायकांकडून कित्येकदा, शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकटं अर्थ घेतला जातो.
- स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरूष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरूष फायदा घेतात, ही किंवा अशा तर्हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आला आहे.
- जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तीला पसंत करायचं, त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरीर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
- संवाद दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात.
- मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
- संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
- कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
- जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
- खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
- प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
- आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
- शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
- घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
- माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
- बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
- कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
- पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
- वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
- कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
- आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
- समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
- संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
- अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
- वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
- खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
- सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
- चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
- तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
- औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
- गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
- अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
- भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
- आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
बाह्य दुवे
संपादन- वसंत पुरुषोत्तम काळे ब्लॉग (मराठी मजकूर)
- वसंत पुरुषोत्तम काळे facebook page (मराठी मजकूर)
- वपुर्वाई ब्लॉग (मराठी मजकूर)