मोक्ष
मोक्ष
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन
मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे. |
श्रीमद्भगवद्गीता
संपादनश्रीमद्भगवद्गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)
संपादनमूळ श्लोक
- किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
- तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ ४-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कर्म किम् = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम् = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत् = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात् = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत् = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥
अर्थ –
कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥
मूळ श्लोक
- एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
- कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
एवम् = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान् = ते, सर्वान् = सर्व, कर्मजान् = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम् = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील ॥ ४-३२ ॥
अर्थ –
अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. ॥ ४-३२ ॥
श्रीमद्भगवद्गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)
संपादनमूळ श्लोक
- प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
- बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), प्रवृत्तिम् = प्रवृत्तिमार्ग, च = आणि, निवृत्तिम् = निवृत्तिमार्ग, कार्याकार्ये = कर्तव्य आणि अकर्तव्य, भयाभये = भय व अभय, च = तसेच, बन्धम् = बंधन, च = आणि, मोक्षम् = मोक्ष हे सर्व, या = जी बुद्धी, वेत्ति = यथार्थपणे जाणते, सा = ती, बुद्धिः = बुद्धी, सात्त्विकी = सात्त्विक आहे ॥ १८-३० ॥
अर्थ –
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. ॥ १८-३० ॥
मूळ श्लोक
- सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
- अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
सर्वधर्मान् = सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे यांचा, (मयि) = माझ्या ठायी, परित्यज्य = त्याग करून, एकम् माम् = सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मज एका परमेश्वरालाच, शरणम् = शरण, व्रज = ये, सर्वपापेभ्यः = सर्व पापांतून, अहम् = मी, त्वा = तुला, मोक्षयिष्यामि = मुक्त करून टाकीन, मा शुचः = तू शोक करू नकोस ॥ १८-६६ ॥
अर्थ –
सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. ॥ १८-६६ ॥