मुख्य मेनू उघडा

झाशीची राणी लक्ष्मीबाई

मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई' एकोणिसाव्या शतकातील झाशीची राणी होती.


झाशीची राणी लक्ष्मीबाई

महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्‍या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी! हे मोरोपंत तांबे मूळचे (जळगाव जिल्ह्यातील) पारोळ्याचे. महाराष्ट्रीय माता-पित्यांच्या (वडील-मोरोपंत; आई- भागीरथी बाई) पोटी काशी येथे जन्मलेल्या मनुने, पुढे शूरवीर झाशीची राणी बनून ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून अढळ स्थान प्राप्त केले. दुसर्‍या बाजीरावांकडे आश्रयाला असणार्‍या मोरोपंतांच्या मनुला मातृसुख लाभले नाही. वयाच्या ३-४ थ्या वर्षीच आई वारल्याने मनु नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्‍या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली. मोठे, पाणीदार डोळे असणारी ही मोहक कन्या दुसर्‍या बाजीरावांचीच नव्हे तर सर्वांचीच लाडकी होती. बाजीरावाने तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवून लिखाण-वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर ब्रह्मावर्तामधल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्र्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदुक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले.